दुसरे बाजीराव पेशवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरा बाजीराव या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

दुसरा बाजीराव (इ.स. १७७५२८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]

जन्म आणि बालपण[संपादन]

बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला.

पेशवेपद[संपादन]

सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली.

१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर सत्तेच्या लालसेने यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला चढवला. तेव्हा दौलतराव शिंदे आणि बाजीरावांनी होळकरांविरुद्ध लढा दिला. शेवटी पुण्याजवळील हडपसर येथे होळकरांचा विजय झाला. आणि बाजीरावांनी पुणे सोडून वसई येथे इंग्रजांचा आश्रय घेतला. २ मे १८०२ ला बाजीरावांचाच भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला.

डिसेंबर १८०२ ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध[संपादन]

दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्या ना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या. शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले.

सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेऊन ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील दुसर्‍या बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला दुसरी/बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियन ही ५०० महार सैनिकांची होती . केवळ 500 महार सैनिकांनी हा विजय मिळवला. त्यात पेशव्यांचे मराठा २८०० सैनिक कामी आले  भीमा नदीकाठी मोठे युद्ध पेटले. युद्धात १७५ ब्रिटिश सैनिक मेले, अर्ध्याहून जास्त जखमी झाले. त्र्यंबकजी डेंगळेंनी, बापू गोखल्यांच्या मुलाचा खून केलेल्या लेफ्टनंट चिशमला ठार मारून बदला घेतला. पण ह्या युद्धात मराठ्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले. जवळपास ५०० मराठे मारले गेले. शिंदे-होळकर-भोसले यांच्या मदतीची वाट बघत पेशव्यांनी इंग्रजांबरोबर अनेक छोट्या-मोठ्या लढाया केल्या. पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळाली नाही.

पेशवाईचा अस्त[संपादन]

शेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली.

इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला.

इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते."

संदर्भ[संपादन]

ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३
ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९

अधिक माहिती[संपादन]

ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.